Crop Insurance : खरीप पीकविमा: जानेवारीअखेर पात्र शेतकऱ्यांना भरपाई
राज्यातील ९४ लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी एकूण ५२६ कोटी रुपयांचा पीकविमा हिस्सा भरला होता. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सव्वादोन लाख शेतकऱ्यांचे सुमारे १४ कोटी रुपये समाविष्ट आहेत. पीक कापणी प्रयोग पूर्ण झाल्यानंतर अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न आणि प्रत्यक्षात मिळालेल्या उत्पन्नाची सविस्तर माहिती केंद्र सरकारकडे पाठविण्यात आली असून त्यावर कार्यवाही सुरू आहे. जानेवारीअखेर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याची रक्कम जमा होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
खरीप हंगामात राज्यात मोठ्या प्रमाणावर मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर यांसारखी पिके घेतली जातात. याशिवाय कांदा व इतर पिकांची लागवडही होते. राज्य सरकारने ‘एक रुपयात पीकविमा योजना’ बंद केल्यानंतरही, पिकांचे नुकसान झाल्यास संरक्षण मिळावे या उद्देशाने तब्बल ९४ लाख शेतकऱ्यांनी स्वतः विमा हप्ता भरून पिकांचा विमा उतरवला. Crop Insurance
राज्यभरात सुमारे ५० हजार ठिकाणी पीक कापणी प्रयोग राबविण्यात आले. या प्रयोगांमधून अपेक्षित (Threshold) उत्पन्न, उंबरठा उत्पन्न आणि प्रत्यक्ष उत्पादन यांची माहिती संकलित करण्यात आली. ही सर्व माहिती राज्याच्या कृषी विभागामार्फत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आली आहे.Crop Insurance
केंद्र सरकारकडून या डेटावर प्रक्रिया सुरू असून २० जानेवारीनंतर कोणत्या जिल्ह्यातील, तालुक्यातील किंवा महसूल मंडळातील शेतकरी पीकविम्यासाठी पात्र ठरणार आहेत, तसेच कोणत्या पिकांना भरपाई मिळणार आहे, हे स्पष्ट होणार आहे. मात्र, पीकविमा भरलेले सर्वच शेतकरी भरपाईस पात्र ठरणार नाहीत, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी ठरावीक महसूल मंडळांतील शेतकरी पात्र ठरतील, तर काही जिल्ह्यांतील संपूर्ण तालुके पात्र ठरू शकतात.
महत्त्वाचे म्हणजे, उंबरठा उत्पन्नापेक्षा प्रत्यक्षात मिळालेले उत्पादन जास्त असल्यास पीकविमा मिळत नाही. उंबरठा उत्पन्न आधीपासूनच कमी ठरविलेले असल्यामुळे अनेक वेळा सर्व विमाधारकांना भरपाई मिळत नाही. पुढील महिन्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा पीकविमा मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.